हृदयद्रावक ! लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तरुणाचा अपघाती मृत्यू ; नवविवाहितेचा आक्रोश पाहून सारे सुन्न
हृदयद्रावक ! लग्नाची हळद सुकण्यापूर्वीच तरुणाचा अपघाती मृत्यू ; नवविवाहितेचा आक्रोश पाहून सारे सुन्न
img
Dipali Ghadwaje

रत्नागिरी :  रत्नागिरी येथील नाखरे येथील एका तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पावस येथून नाखरे येथील आपल्या घरी परत जाताना त्याचा अपघातात मृत्यू झाला,  या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

हृदयद्रावक बाब म्हणजे या तरुणाचं महिनाभरापूर्वीच लग्न झालं होतं. नेहमी हसतमुख चेहरा असलेला तसेच आंबा बागायत शेतकरी असलेल्या तरुणाची अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत तरुणाचं नाव चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसुरकर असं असून, तो नाखरे येथील रहिवासी होता.

 चंद्रवदन हा पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून परतत असताना हा अपघात घडला. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची एका कारशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात त्याच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाला.

चंद्रवदन हा एक अष्टपैलू तरुण होता. त्याला ट्रेकिंगची आवड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यवसायिक म्हणूनही ओळखला जात होता. त्याने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याचं नुकतंच एक महिन्यापूर्वी लग्न झालं होतं.

नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते, लग्नाची हळदही अजून सुकली नव्हती चंद्रवदन आणि सगळं कुटुंब आनंदात असतानाच निष्ठूर नियतीने डाव साधला. यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group