"आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार", शिंदेंच्या शिलेदाराचा गौप्यस्फोट
img
Dipali Ghadwaje
 मुंबई : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत अनिश्चिता आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचीही चर्चा रंगत असते.

या पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी जागावाटपाबाबत गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेनेचे सर्व १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत, असा गौप्यस्फोट रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने  यांनी केला आहे. 

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असली तरी महायुती असो की मविआ, यांच्यात अद्याप जागावाटप झालेले नाही, यामुळे तुमाने यांचे वक्तव्य महत्वाचे ठरत आहे.

दरम्यान खासदार कृपाल तुमाने म्हणाले, आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचे झाल्यास, माझ्या मतदारसंघातील ५८ सर्कलमध्ये ५८ मेडिकल कॅम्प घेणार आहे. आज चौथा मेडिकल कॅम्प झाला. 

फेब्रुवारीपर्यंत ५८ मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहोत. खासदार तुमाने म्हणाले, सर्वच उमेदवार आपआपल्या मतदारसंघात काम करत आहेत. मी पाच वर्ष मुंबई, दिल्लीत फार कमी असतो. कारण मी मतदारसंघात राहणे पसंत करतो आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवसेनेच्या सर्व १३ खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला लागण्याचे निर्देश दिले असून तुम्हाला निवडणुका लढवायच्या असल्याचे सांगितले आहे. 

शिवसेनेच्या सध्याच्या काही खासदारांचे तिकिट कापले जाईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे, याबाबत विचारले असता तुमाने म्हणाले, हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विषय आहे, ते याबद्दल निर्णय घेतील. मात्र आम्ही सर्व १३ खासदार शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहोत
इतर बातम्या
Join Whatsapp Group