नाशिक :- 20 हजार रुपयांची लाच घेताना वन अधिकारी व वनरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सातपुर वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी शैलेंद्र आनंद झुटे (वय ४८) व तेथिलच वन रक्षक साहेबराव बाजीराव महाजन (वय ५४) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे हॉटेल हे वनविभागाच्या मालकीचे जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या बांधकाम करून ते व्यवसाय करत आहे असे झूटे यांनी सांगितले. तसेच तुम्ही मागील दहा वर्षापासून या जागेवर अतिक्रमण केले आहे व पुढील अजून दहा वर्ष कारवाई होऊ नये असे वाटत असेल तर सुरवातीला एक लाख रुपये व त्यानंतर तडजोडी अंती 60 हजार रुपये मागणी केली.
तसेच तक्रारदार यांचेविरुध्द कारवाई न करण्यासाठी अंतिमतः तडजोडी अंती तीस हजार रुपये घेण्याचे मान्य केले. तीस हजार रुपयांपैकी वीस हजार रुपये घेताना आज रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांचेवर सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक विनोद चौधरी, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, महिला पोलीस अंमलदार शितल सूर्यवंशी, चालक पोलीस हवालदार परशुराम जाधव यांनी केली.