महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा निवासस्थानी ही भेट झाली आहे. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला येण्यामागे दोन कारणं समोर आली आहेत. पहिलं कारण म्हणजे दुकानांवरील मराठी पाट्या. सर्वोच्च न्यायालयाने दुकानावरील मराठी पाट्यांसंदर्भात निर्णयानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.
दरम्यान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीचा दुसरा महत्त्वाच्या मुद्दा म्हणजे टोल. ऑक्टोबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोल मुद्द्यावरून (Toll) भेट घेतली होती. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना काही आश्वासनं दिली होती.
दुकानांवरील ठळक अक्षरातील मराठी पाट्या हा मुद्दा सध्या तापलेला आहे. यासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. प्रशासनाडून मुख्यत: मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई थातूर-मातूर असल्याचा आरोप मनसैनिकांचा आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोशल मीडियावर माहिती
या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.''