मुंबई : अलीकडेच अभिनेत्री पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे सांगितले गेले. पूनम पांडे हिच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताना दिसली. पूनम पांडे हिचे निधन झाल्याचे कळताच बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. फक्त हेच नाही तर अनेक चाहत्यांनी थेट पूनम पांडे हिच्या अंत्यदर्शनासाठी तिच्या मुंबईतील घराकडे धाव घेतली. पूनम पांडे हिचे निधन हे गर्भाशयातील कॅन्सरने झाल्याचे कळाल्यापासून लोकांमध्ये भितीचे वातावरण हे बघायला मिळाले.
मात्र, मोठा संभ्रम देखील बघायला मिळाला. मृत्यूचा खोटा दावा करणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडेला सर्वच स्तरांवरुन संतप्त प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. पूनम पांडेने सर्विकल कॅन्सरविरोधात जनजागृती निर्माण व्हावी म्हणून तिच्या मृत्युची खोटी बातमी पसरवली.
याशिवाय केंद्र सरकार पूनम पांडेला सर्विकल कॅन्सर जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडर बनवू शकते अशीही चर्चा होती. मात्र या सर्व चर्चांवर भारत सरकारने मौन सोडलं असून पूनमला सणसणीत उत्तर दिलंय.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, "गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेच्या ब्रँड ॲम्बेसेडरशिपसाठी अभिनेत्री पूनम पांडेच्या नावाचा कोणताही विचार केला जात नाही." त्यामुळे पूनम पांडेने केलेला स्टंट तिच्या अंगलट आल्याचं दिसत असून तिने भारत सरकारची सर्विकल जनजागृती मोहिमेची ब्रँड ॲम्बेसेडरशिपची ऑफर गमावली असल्याचं चित्र दिसतंय.
काही दिवसांपुर्वी पूनम पांडेचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यु झाल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेत होती. त्यामुळे अनेकांनी पूनमच्या अकस्मात निधनाने शोक व्यक्त केला. पण काहीच तासांमध्ये पूनमच्या मृत्युची बातमी खोटी असल्याचे उघड झाले. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी "जागरूकता" पसरवण्यासाठी अभिनेत्री आणि तिच्या टीमने केलेला हा 'स्टंट' असल्याचे उघड झाले.