..... तर आम्ही टोलनाके पेटवू, पहा काय म्हणाले राज ठाकरे?
..... तर आम्ही टोलनाके पेटवू, पहा काय म्हणाले राज ठाकरे?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलबाबत घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिक मैदानात उतरले आहेत. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, देवेंद्र फडणवीसांनी  सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. त्यानंतर मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी टोलनाक्यावरुन उतरून, लहान वाहने विनाटोल सोडले. 

अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. तिकडे मनसैनिकांनी  जुन्या मु्ंबई-पुणे हायवेवर असलेल्या शेडूंग टोल नाका येथे आंदोलन सुरु केलं. मनसेने शेडूंग टोल नाका येथून जाणाऱ्या वाहनांना विनाटोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडले. 

राज ठाकरे काय म्हणाले? 
महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? 
जी घोषणा आम्ही टोलमुक्तीची केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group