आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकारणात जोरदार रणधुमाळी पाहायला मिळते आहे .आणि त्याप्रमाणे सर्व पक्षही जोरदार कामाला लागले आहेत दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . दरम्यान याविषयी आता मोठी अपडेट समोर आली आहे . याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला आहे. येत्या 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. येत्या गुरुवारी 26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल. यानंतर त्याच दिवशी दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.
तसेच , यापाठोपाठ दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. तसेच शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. या सर्व बैठकींमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणूक याबद्दलचा आढावा घेतला जाईल.
यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी किती पोषक वातावरण आहे, याबद्दलची माहिती जाणून घेईल. त्यानंतर शनिवारी 28 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे. यानंतर दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषेदनंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान , केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्यानतंर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, अशीही चर्चा सध्या रंगली आहे.