विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक डावपेच पाहायला मिळत आहेत . निवडणुका तोंडावर असताना पक्षांतील नेत्यांचे पक्षांतर
अशा अनेक छोट्या मोठ्या घडामोडींना चांगलाच वेग आल आहे. दरम्यान , उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शेजारील तालुक्यातूनच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी हाती तुतारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. रमेश थोरात हे सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचे अलिखित सूत्र ठरलेले असून ‘जिथे ज्याचा आमदार तिथली जागा त्यांच्याकडे’ यानुसार दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्याकडेच ही जागा जाणार असल्याने त्यांचे परंपरागत विरोधक रमेश थोरात त्यांचा पुढील ‘मार्ग’ शोधत आहेत
याविषयी थोरात यांनाच विचारले असता त्यांनी ठामपणे जर शरद पवार यांनी माझ्या हाती तुतारी दिली तर मी नक्की घेईन आणि निवडणुकीला सामोरे जाईन, असे सांगितले. महायुतीत जागा भाजपला जाणार हे मला माहिती आहे. गेली ४० वर्षे राजकारण करतोय. त्यामुळे तालुका-जिल्हा आणि राज्याचे राजकारण बऱ्यापैकी जाणतो. परंतु मी तालुक्यात फिरत असताना, गावागावात जाऊन लोकांशी बोलत असताना मला निवडणूक लढविण्याविषयी लोकांमधून कमालीचा आग्रह आहे.
कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की काहीही करून आपण निवडणुकीला उभे राहावे लागेल. आम्ही ऐकणार नाही. तुतारी मिळाली तर तुतारी घ्या, नाहीतर अपक्ष लढा, असा लोकांचा आग्रह आहे. म्हणून मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. अगदी जनतेचीच इच्छा असेल तर मला तुतारी हाती घ्यावी लागेल.
अजित पवार यांच्याशी तुमचे बोलणे झालेय का? असे विचारले असता, ते म्हणाले, गेली ४० वर्षे राजकारण समाजकारणात असल्याने त्यांच्याकडे जागेसंबंधी हट्ट करणार नाही. पण जनता ठरवेन तसे मी ऐकेन.कारण लोकशाहीत जनता राजा असते.…
शरद पवारसाहेबांशी चर्चा झाली आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, पवारसाहेब आमचे दैवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात काम करतोय. मधल्या काळात काही राजकीय घडामोडी झाल्यावर थोडे अलीकडे पलीकडे झाले असेल पण त्यांच्याविषयी आदर कायम होता. त्यांच्याशी किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी अजूनपर्यंत सुसंवाद झाला नाही. पण तालुक्याच्या जनतेच्या विरोधात मी जाणार नाही. तुतारी मिळाल्यास तुतारी घेईन नाहीतर अपक्ष लढेन असेही ते म्हणाले.