नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- महिलांच्या सुरु झालेल्या योजना कायम चालवण्यासाठी पुन्हा सरकार आले पाहिजे. त्यासाठी आमदारf सरोज आहिरे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर जनसन्मान यात्रा सुरु केली आहे.
त्याची सुरूवात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी व देवळाली विधानसभेतुन करण्यात आली. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगनराव भुजबळ, अनिल पाटील, धनंजय मुंडे, महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करतांना आमदार सरोज आहिरे यांनी त्यांच्या आईची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी बोलताना ना. पवार म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून आजपर्यंत दहा वेळा राज्याचे बजेट सादर केले, अनेक वर्षांपासून जिल्हा बँक तसेच अनेक आर्थिक संस्थांमध्ये काम केल्याचा दांडगा अनुभव व ज्ञान असल्याने महायुतीचा घटक म्हणून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यासाठी राज्य सरकारचे 45 हजार कोटी रुपये खर्च होतील.
आज या योजनेसाठी राज्यभरातून सुमारे एक कोटी 70 लाख महिलांनी अर्ज भरले आहे व त्या पात्र झाल्या आहेत. अजूनही महिला या योजनेत अर्ज दाखल करीत आहेत. या बहिणीच्या खात्यावर जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहे. या योजना पाहून विरोधक यांनी अपप्रचार सुरु केला. मात्र बहिणी सोबत लाडका भाऊ योजना जाहीर केली. सरकारने एवढ्यावर न थांबता शेतकऱ्यासाठी मोफत वीज देण्याचे ठरवले असून कोणीही वीज बिल भरायचे नाही, असे सांगताच त्यांनी टाळ्या मिळवल्या.
लाडक्या बहीण योजने बरोबरच महिलांना वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गरीब व गरजू महिलांचे सबलीकरण व तिला आर्थिक सक्षम करण्याचे राज्य सरकार करीत आहे.
बहीण, भाऊ, शेतकरी बरोबर 12वी पास, डिग्री, व अधिकचे शिक्षण घेतलेल्या युवक युवती यांना राज्य सरकार मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना प्रशिक्षण काळात दहा हजार रुपये व सरकारी प्रमाणपत्र राज्य सरकार देणार असल्याचे ना.पवार यांनी सांगितले.
प्रशिक्षण उत्तमपणे घेतले तर त्या युवकांना तिथेच नोकरी लागण्याची शक्यता आहे. राज्यात उद्योग, व्यवसाय वाढीसाठी राज्य सरकार अनेक कारखान्यांसोबत बोलणे करीत असून लवकरच किर्लोस्कर, टोयोटा, जिंदाल या सारखे कारखाने येत आहे. तसेच मुलींना कमी खर्चात शिक्षण देत असत मात्र आत्ता त्यांना पूर्ण मोफत शिक्षण देण्याचा निर्णय सरकार ने केला असल्याचे ना. पवार यांनी सांगितले.
देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांना मतदारसंघात काम करण्यासाठी सुमारे 14 ते 15 कोटी रुपये दिले असून या पुढे त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या पूर्ण करण्यासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ना. पवार यांनी दिले. आमदार सरोज आहिरे या प्रभावीपणे काम करीत आहे.
मतदारसंघातील अनेक कामे करून घेण्यासाठी त्या मुख्यमंत्री सह अनेक मंत्री यांना आग्रह करीत असतात व कामे मंजूर करून घेतात. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता आमदार सरोज आहिरे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून त्यांना पुन्हा आशीर्वाद द्या, असे आवाहन करीत सर्व योजना कायम चालवण्यासाठी येत्या काळात महायुती चे सरकार येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिलांनी ना. अजित पवार यांचे औक्षण केले व राख्या बांधल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार सरोज आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरघोस निधी दिल्याने मतदारसंघात विकास करण्यात आल्याचे सांगत त्यांचे आभार व्यक्त केले. महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या पुढाकाराने महिला, भाऊ व शेतकरी यांच्यासाठीच्या अनेक योजना आणल्या आणि त्याची अंमलबजाणी होत असल्याने समाधान व्यक्त केले.
त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज मंदिरासाठी लवकर आराखडा तयार करणार असून त्यासाठी निधीची मागणी केली. अनेक कामे मतदार संघात करायची असल्याने अजित पवार यांनी भावासारखे मागे उभे राहून निधी द्यावा अशी अहिरे यांनी मागणी केली. यावेळी शहर, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.