बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारण रंगत आहे. अशातच आज पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी मुलगा जय पवार यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
"जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर आमच्या पक्षाचे पार्लामेंट्री बोर्ड त्याबाबतचा निर्णय घेईल," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?
"जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्यांना उमेदवारी देणार का?" असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, "शेवटी लोकशाही आहे. मीही बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली असल्याने मला आता तिथून लढण्यास फार रस नाही. जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जनतेचा कल असेल तर पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाकडून तोही विचार केला जाईल," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी नुकतीच एक शंका उपस्थित केली होती. "लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता. आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत अजितदादांवर असल्याची चर्चा आहे," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बारामतीत जय पवार यांना उमेदवारी देऊन अजित पवार हे स्वत: कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार का, हेच बघणं आता महत्वाचं ठरेल.