राज्याच्या राजकारणात सध्या असे चित्र आहे की अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील, असे वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात महायुतीचं सरकार आहे. या सरकारमध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून सहभागी झाले आहेत. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र त्याआधीच महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवार महायुतीत नाराज आहेत अशा चर्चा सातत्याने होत आहेत. मध्यंतरी तशा काही घटनाही घडल्या होत्या त्यावरूनही अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असा अंदाज बांधला जात आहे. या घडामोडीतच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
सध्या अशी अनेक चिन्ह दिसत आहे की अजित पवार महायुतीतून बाहेर येतील. किंबहुना ते आमच्यात येतील आणि मोठी महाशक्ती तयार होईल. अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तरच त्यांना त्यांची जागा मिळेल अन्यथा मिळणार नाही. आगामी काळात सगळ्या आघाड्या आणि युतीत फाटाफूट होईल असे दिसत आहे. आघाडी आणि युतीतून बाहेर पडलेल्या नेत्यांना आमच्या आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय सुकाणू समिती घेईल. अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असे काही संकेत मिळत आहेत. जशी तुमची सूत्रे असतात तशी आमचीही असतात असे बच्चू कडू पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. अजित पवार गटाकडून 70 ते 80 जागांची मागणी केली जात आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांच्या वक्तव्यांवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अजित पवार आता लवकरच महायुतीतून बाहेर पडतील अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाल्या आहेत.