प्रेमविवाहातून अनेक घटना घडत असतात. परंतु सासऱ्याच्या प्रेमविवाहाची शिक्षा सुनेला देण्यात आल्याची अजब घटना बीड मध्ये घडली आहे .
सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला शिक्षा देत सात पिढ्या समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. विविध समाजातील जात पंचायतीकडून होणाऱ्या सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रात कायदा झाला. अधिनियम – २०१६ या पद्धतीचे कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. त्यानंतर राज्यातील अनेक भागांत जात पंचायतींचे वर्चस्व सुरु आहे. लोकशाही असणाऱ्या या देशांमध्ये जातपंचायत बोलावणं हा कायद्याने गुन्हा मानला जातो. परंतु हा गुन्हा आजही काही लोक सर्रास करत असल्याचा प्रकार बीडच्या आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलाय
बीडच्या कडा साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मालन शिवाजी फुलमाळी हे तिरमाली नंदीवाले या जातीचे आहेत. मालन यांच्या सासऱ्याने समाजाची परवानगी न घेता प्रेमविवाह केला. त्यामुळे त्यांना तेव्हा अडीच लाख रूपयांचा दंड ठोठावला. त्यांनी तो न भरल्याने सुनेसह मुलाला जात पंचायतमध्ये बोलावलं. त्यांनीही असमर्थता दर्शविल्यानं पंचांनी या कुटुंबाला सात पिढ्या समाजातून बहिष्कृत करण्याचा आदेश दिला. तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास जीवे मारू अशा, धमक्याही दिल्या. हा प्रकार 22 सप्टेंबर 2024 रोजी आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे घडला आहे. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेर 9 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मालन शिवाजी फुलमाळी (वय 32 रा.कडा कारखाना ता.आष्टी) असं जातपंचायत पीडित सुनेचं नाव आहे. मालन यांचे सासरे नरसू फुलमाळी यांनी समाजाची परवानगी न घेता प्रेम विवाह केला होता. यांची जात ही नंदीवाले (तीरमाली) अशी आहे. तेव्हा जात पंचायत बसविण्यात आली. यामध्ये नरसू फुलमाळी यांना 2 लााख 50 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. आम्ही तो दंडा कसा भरावा? असा सवाल मालन फुलमाळी यांनी उपस्थित केला.
“आम्हाला जर जातीमध्ये घेतलं नाही तर आम्ही सगळे सर्व कुटुंब आत्मदहन करू सरकारने आम्हाला जातीमध्ये घेण्यासाठी जात पंचायतीला सांगावं” अशी व्यथा शिवाजी फुलमाळी यांनी मांडली.
दरम्यान, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरात आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक विक्रांत हांगे यांनी दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गंगाधर बाबु पालवे, उत्तम हनुमंत फुलमाळी, गंगा गंगाराम फुसमाळी, चिन्नु साहेबराव फुलमाळी, सुभाष फुलमाळी, बाबुराव साहेबराव फुलमाळी, शेटीबा रामा काकडे, सयाजी सायबा फुलमाळी, गुलाब पालव यांच्यासह इतर पंचांवर सामाजिक बहिष्कार अधिनियम 2016 मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षण 4, 5, 6 तसंच बीएनएस 189 (2), 351 (2) (3), 352 अशा कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.