नर्सिंगचा पेपर फुटला, १४ तासांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर प्रश्नपत्रिका पोहोचली,  कुठे घडला प्रकार ?
नर्सिंगचा पेपर फुटला, १४ तासांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर प्रश्नपत्रिका पोहोचली, कुठे घडला प्रकार ?
img
दैनिक भ्रमर
 राज्यातील पेपरफुटीची मालिका अजूनही कायमच आहे. बुलढाणा जिल्ह्यात परिचारिका अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे आज आढळून आले. विध्यार्थ्यांच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पूर्ण प्रश्नपत्रिकाच आल्याचे आणि आजच्या पेपरमधील प्रश्न जवळपास सारखेच असल्याचे प्राथमिक चौकशी आढळून आले. 

जीएनएम या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेकरिता शासकीय व येळगाव येथील पैनगंगा नर्सिंग कॉलेज अशी दोन परीक्षा केंद्रे आहेत. दरम्यान , नर्सिंगचा ( जीएनएम) एका विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार बुलढाणा येथे घडला आह. जीएनएम’च्या द्वितीय वर्षाच्या ‘मेंटल हेल्थ’ विषयाचा पेपर येळगाव येथील पैनगंगा नर्सिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटला. पेपर सुरू झाल्याच्या अवघ्या दहा मिनिटांतच विद्यार्थी कॉपी करायला लागल्याचे केंद्रप्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर तपासणी करण्यात आली. यात पाच विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका आढळली. या प्रकरणात १४ विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेपर सुरू होण्याच्या १४ तासांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर प्रश्नपत्रिका पोहोचली होती.

दरम्यान  , पैनगंगा केंद्रावर शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या मीना शेळके या केंद्रप्रमुख म्हणून कर्तव्यावर होत्या. शेळके म्हणाल्या, ‘मुंबईच्या एमएसबीएनपीए महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन मुंबई) या बोर्डाकडून जीएनएम द्वितीय वर्षाचा ११ ते २ या वेळेत मेंटल हेल्थ हा पेपर सुरू होता. ११ वाजून १०मिनिटांनी एका विद्यार्थ्याने शर्टच्या बाहीवर कॉपी केल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न सारखेच आढळले. त्याच्याकडे अख्खा पेपरच मिळाला. त्यामुळे आणखी तपासणी केली असता एक विद्यार्थिनी व चार विद्यार्थ्यांनीही कॉपी केल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. यात बुधवारी रात्री पावणेनऊला पेपर आला होता. हे पेपर व्हायरल झालेले मोबाइल जप्त करण्यात आले आहे.

तसेच , पेपरफुटीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. १४ विद्यार्थ्यांकडून मोबाइल जप्त केले असून त्यात प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराबाबत नर्सिंग कौन्सिलला कळविले आहे. चौकशीअंती पोलिस तक्रार अथवा पुढील कारवाईसंदर्भात कौन्सिल निर्णय घेईल.-डॉ. भागवत भुसारी, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलढाणा
इतर बातम्या
Join Whatsapp Group