अजित पवारांनी भाजपच्या ''या'' आमदाराची अमित शहांकडे केली तक्रार , काय आहे कारण ?
अजित पवारांनी भाजपच्या ''या'' आमदाराची अमित शहांकडे केली तक्रार , काय आहे कारण ?
img
दैनिक भ्रमर
 गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून मुस्लीम समाजाविषयी करण्यात येत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. मुस्लीमविरोधी वक्तव्यं करणाऱ्या या नेत्यांच्या भूमिकेचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. याची दखल घेत अजित पवार यांनी या भाजप  नेत्यांविरोधात भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे   तक्रार केली आहे.

केंद्रीय स्तरावरून लवकरच नितेश राणे यांना समज देण्यात येईल. विधानसभेच्या तोंडावर महायुतीला फटका बसू नये, अशी काळजी घेण्यात येईल, असे केंद्र भाजपने कळविल्याचे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितल्याचे कळते आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ मतदारांमध्ये अल्पसंख्याक समुदायाचा देखील समावेश आहे. अजित पवार देखील आपल्या भाषणांमधून वारंवार अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने असल्याचे सांगत आहेत. मात्र सरकारचा भाग असलेल्या पक्षाचे आमदार नितेश राणे हिंदुत्वाच्या नावाखाली मुस्लिम समाजाविषयी गरळ ओकत आहेत. नितेश राणे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांना रोषाला सामोरे जावे लागते. हाच मुद्दा अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या कानावर घातला. त्यावेळी आपण नितेश राणे यांची केंद्रीय स्तरावर तक्रार केल्याची माहिती त्यांनी आमदारांना दिली. तसेच अमित शाहांकडून पक्षाचा सेक्युलर अजेंडा चालविण्याबद्दल अडचण नसल्याचे देखील त्यांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

तसेच , महायुतीतील काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांकडून सातत्याने महायुतीची बदनामी होत आहे. तसेच नागरिकांकडूनही वाचाळवीरांबाबत संताप होत असतो. याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी भीतीही अजित पवार गटाने केंद्रीय भाजपजवळ व्यक्त केली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group