पुणे : महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. पुणे नाशिक दरम्यान महाराष्ट्रातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन धावणार आहे. यामुळे पुणे नाशिक दरम्यानचा जळपास तब्बल साडे पाच तासांचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक दरम्यान नवी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. या मार्गाचा नवीन आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना दिलीये. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे वाजे यांनी सांगितले.
नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली. दिल्लीत वैष्णव आणि वाजे यांच्यात या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांपासून अनेक अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला आहे. आता खासदार वाजे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. हा मार्ग शिर्डीवरून होणार की संगमनेर मार्गे जाणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, आता मार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच होणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, महारेलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’चा सुरक्षा संवेदनशील प्रकल्प आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे संचालित जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ टेलिस्कोप) वापरण्याचा रेल्वेला प्रस्ताव होता. मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच रेल्वेमंत्री आणि खासदार वाजे यांच्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीनंतर नव्याने आराखडा बनवण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.
आता नारायणगावमधील जीएमआरटी प्रकल्पाला वळसा घालून रेल्वेकडून नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी नवीन डीपीआर अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वाजे यांना दिली आहे. तसेच आगामी पाच वर्षांच्या कालावधीत देशाला विकसित भारत म्हणून पुढे जायचे आहे. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.