राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली असून गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी पार पडला.
दरम्यान, सत्तास्थापने नंतर यंत्रणाही कामाला लागली असून राज्यात नवीन सरकार स्थापन होताच ईडी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाली आहे. अहमदाबाद आणि मुंबईमध्ये 7 ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये 13.5 कोटी रुपये सापडले आहेत. ईडीच्या मुंबई झोनने ही कारवाई केली आहे. ईडीने जप्त केलेली ही रक्कम, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मालेगाव प्रकरणाशी संबंधित आहे.
दरम्यान, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र मधील खात्यांद्वारे केलेल्या ‘डेबिट व्यवहार’ चा ईडीद्वारे केलेल्या मनी ट्रेल तपासणीत असे दिसून आले की अशा बहुतेक रकमा 21 एकल मालकीच्या संबंधितांकडे हस्तांतरित केल्या गेल्या. तपासात असंही समोर आलं आहे की या खात्यांमध्ये शेकडो कोटी जमा केले गेले. यातील बहुतेक रक्कम ऑनलाइन बँकिंग चॅनेलद्वारे, आणि पुढे विविध फर्म/कंपन्यांना हस्तांतरित केली गेली. तसंच शेकडो कोटी रुपयांची प्रचंड रक्कम विविध डमी संस्थांच्या खात्यातून रोखीने काढण्यात आली आणि काढलेली रोख रक्कम अहमदाबाद, मुंबई आणि सुरत येथे असलेल्या अंगडिया/ हवाला ऑपरेटरना वितरित केली. याआधी नोव्हेंबर महिन्यातही याप्रकरी धाडी टाकण्यात आल्या होत्या.