विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारणातील घडामोडींचा वेग आला आहे. निवडणुका कोणत्याही घडीला जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्ष सर्वोतपरी प्रयत्नांनी आपली रणनीती आखत आहेत.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडी आणि इतर काही छोटे पक्ष तिसरी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना ऑफर दिली असून वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांनी आरपीआयसोबत यावे. ते आल्यास मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे आवाहन त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (RPI) स्थापना दिनानिमित्ताने रामदास आठवले साताऱ्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना आरपीआयमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे. राज्यात महायुतीच्या जागा वाटपात आरपीआयला 8 ते 10 मिळाव्यात असे आठवले यांनी म्हटले. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका असा इशारा देखील रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.