धुळे जिल्ह्यातून अंगाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे .धुळे शहरात गुरुवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची माहिती देताना धुळे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या दाम्पत्याने मुलांना विषारी द्रव्य प्राशन करून त्यांची हत्या केली त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास धुळ्यातील देवपूर भागातील प्रमोद नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात प्रवेश केला असता प्रवीण नावाच्या व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी त्याची पत्नी आणि दोन मुलेही घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली. घरातील हे दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुटुंबातील चारही सदस्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.
कृषी खत विक्रेते प्रवीण गिरासे, त्यांची शिक्षिका पत्नी दीपांजली प्रवीण गिरासे हे त्यांच्या दोन मुलांसह प्रमोद नगर समर्थ कॉलनीतील प्लॉट क्रमांक 8 मध्ये राहत होते. गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांचे घर बंद असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. घरातून दुर्गंधी सुटू लागल्याने आत्महत्येची ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असावी, असा स्थानिकांचा समज आहे. दरम्यान , प्रवीण आणि त्याच्या कुटुंबाचा मृत्यू कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.