बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या कठीण काळातून जात आहे. त्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानचे जवळचे मित्र व राजकारणी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानने कडक सुरक्षा बंदोबस्तात ‘बिग बॉस १८’ चे शूटिंग केले. अशातच भजन सम्राट अशी ओळख असलेल्या अनुप जलोटा यांनी सलमान खानला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सलमान खानला धमल्या आल्यानंतर त्याचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की सलमानने काळवीटाची शिकार केलीच नाही, तर त्याने माफी का मागावी. माफी मागण्याचा अर्थ त्याने चूक जाहीरपणे कबूल करणं होतं. दुसरीकडे सलमानने काळवीटाची शिकार केली नसेल तरी माफी मागून प्रकरण मिटवावे असं अनुप जलोटा म्हणाले आहेत
अनुप जलोटा काय म्हणाले?
एका वृत्त संस्थेशी बोलताना अनुप जलोटा म्हणाले, “सलमानने काळवीटाची शिकार केली की नाही, ही गोष्ट बाजूला ठेवायला पाहिजे. त्याने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागायला पाहिजे. कारण ही बाब आता अहंकाराची राहिलेली नाही.”
“मला एवढंच म्हणायचंय की कोणी काळवीटाची शिकार केली आणि कोणी नाही, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दिकी यांचा याच कारणावरून खून झाला, त्यामुळे आता हा वाद मिटवण्याकडे लक्ष द्यायला हवे,” असं अनुप जलोटा म्हणाले.
“मी सलमानला एक छोटीशी विनंती करू इच्छितो की त्याने मंदिरात जाऊन त्याच्या सुरक्षिततेसाठी माफी मागावी. त्याने माफी मागून त्याच्या कुटुंबियांचे आणि जवळच्या मित्रांचे रक्षण करावे. मला खात्री आहे की ते त्याची माफी स्वीकारतील. सलमानने जावे आणि माफी मागून सुरक्षित आयुष्य जगावे. काळवीटाची शिकार त्याने केली असो अथवा नाही, त्याने माफी मागावी कारण या वादात अडकून काहीच फायदा नाही,” असं अनुप जलोटा म्हणाले.