राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (शरद पवार) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४५ उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई पाहायला मिळणार आहे. तर, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) विधानसभेसाठीच्या उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यापैकी पहिल्या यादीत ३८ तर दुसऱ्या यादीद्वारे सात उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
दरम्यान गेल्या सव्वा वर्षांपासून या दोन पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. हा संघर्ष महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही दिसणार आहे. शरद पवारांच्या पक्षाने ४४ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही पक्ष १५ मतदारसंघांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राज्यातील १५ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
बारामतीत काका विरुद्ध पुतण्यात तर अहेरी मतदारसंघात बाप विरुद्ध लेक असा सामना रंगणार आहे. अजित पवारांनी अहेरी मतदारसंघातून धर्मराव अत्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर, शरद पवारांनी याच मतदारसंघातून अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.