मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबई व दिल्लीत दिग्गज नेत्यांच्या निवासस्थानी, पक्ष कार्यालयांमध्ये बैठका होऊ लागल्या आहेत. सर्वात महत्त्वाची चर्चा चालू आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सातार्यातील दरे गावातून रविवारी संध्याकाळी ठाण्यातील आपल्या घरी परतले असून त्यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्तावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , भाजपला 21 मंत्रिपदे, शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 मंत्रिपदे मिळणार आहेत. मात्र, शिंदे आणि अजित पवार हे आणखी काही मंत्रिपदे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच महत्त्वाच्या खात्यावरूनही रस्सीखेच सुरू आहे. शिंदेंनी गृह खात्यावर दावा केला आहे. याशिवाय नगरविकास, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, परिवहन, उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) ग्रामविकास आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी शिंदे आग्रही आहेत.
मात्र भाजप गृह खाते सोडण्यास तयार नाही. अजित पवार हे आपले आवडते वित्त खाते मिळावे म्हणून आग्रही आहेत. ते त्यांना देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीला वित्त खात्यासह सहकार, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कृषी आदी खाती मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामविकास किंवा सार्वजनिक आरोग्य यापैकी एक खाते मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. आता कोणाच्या खात्यात कोणती आणि किती खाती जातात, याबाबत उत्सुकता आहे.
यांचा मंत्रिमंडळ समावेश होणार
पाच डिसेंबरला आझाद मैदानावर होणार्या शपथविधी सोहळ्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, डॉ. विजयकुमार गावित, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा या जुन्या चेहर्यांसह डॉ. संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील, शिवेंद्रराजे भोसले, किसन कथोरे, राहुल कूल, नितेश राणे, मेघना बोर्डीकर, प्रशांत ठाकूर, रणधीर सावरकर, योगेश सागर अशा काही नव्या आणि तरुण चेहर्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय राठोड या जुन्या चेहर्यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. तर आशिष जयस्वाल, राजेश क्षीरसागर, भरत गोगावले या चेहर्यांनाही संधी मिळू शकते. माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या समावेशाबाबत मात्र अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांसह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, माणिकराव कोकाटे या नावांचा समावेश होऊ शकतात.