कुर्ल्यातील भीषण बस अपघातानंतर बेस्ट प्रशासनाला अद्याप जाग आलेली नसल्याचे दिसत आहेत. कुर्लात बस चालकाने सात जणांचा बळी घेतल्यानंतरही बेस्टच्या चालकांचा भोंगळ कारभार समोर येत आहे. बेस्ट बसचे चालक ड्युटीवर असताना दारू पिऊन गाडी चालवत असल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी अंधेरी भागात वाईन शॉपवर बस थांबवून दारु घेणाऱ्या चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आणखी एका चालकाने तसेच कृत्य केल्याचे समोर आलं होतं. नागरिकांनी जाब विचारल्यावर चालकाने अरेरावीची भाषा केली होती. अशातच सीएसएमटी परिसरात आणखी एका चालकाने मद्यपान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीएएमटी परिसरातील बस डेपोमधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दारु पिऊन बेस्ट बस चालवणाऱ्या बस चालकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपण दारु प्यायलो असल्याचे बस चालकाने कबुल केलं आहे. मात्र बसमध्ये सापडलेली मद्याची बाटली आपली नसल्याचा दावा चालकाने केला आहे. डेपो परिसरातील सुरक्षा रक्षकाला हा प्रकार कळल्यानंतर त्याने चालकाला याबाबत जाब विचारल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
व्हिडीओमध्ये बस चालकाने मद्यपान केल्याचे दिसत आहे. मी प्यायलो मला, पण माहिती नाही ही बाटली कोणाची आहे. ही बाटली माझी नाही, असं बस चालक म्हणताना दिसत आहे.
त्यावर सुरक्षा रक्षकाने तू दारु पिऊन गाडी का चालवत आहे असा सवाल केला. त्यावर चालकाने ही बाटली आपली नाही असेच वारंवार सांगितले. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने आपण वरिष्ठांना बोलवून घेऊ असं म्हटलं. त्यामुळे बेस्टच्या बस या दारुचा अड्डा आहेत की काय असा प्रश्न आता नागरिकांना पडत आहे.