निफाड : मराठा आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या चाल ढकल धोरणाच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गोदाकाठ भागातील सकल मराठा समाज बांधवांनी गुरूवारी (ता. २) नाशिक- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील चांदोरी त्रिफुली येथे सलग दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. गावागावात आंदोलन सुरु आहे. गोदाकाठ मध्ये प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरु आहे.
याचाच एक भाग म्हणून रस्तारोको करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. सकाळी दहा वाजता गोदाकाठ भागातील सर्व बांधव एकत्र आले. 'एक मराठा,लाख मराठा','आरक्षण आमच्या हक्काचे',छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
चांदोरी त्रिफुली हुन नाशिक छत्रपती संभाजी नगर व ओझर शिर्डी मार्ग जात आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आहे तेथेच थांबली गेली. थोड्याच वेळात वाहनांच्या रांगा लागल्या.हे आंदोलन अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालल्याने पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचा प्रयत्न केला. प्रांताधिकारी हेमांगी पाटील,तहसीलदार शरद घोरपडे यांनी श्रुष्टी मोगल,गीतांजली रुमणे या मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारल्या नंतर मराठा बांधवानी आंदोलन मागे घेतले व या मार्गावरची वाहतूक सुरळीत सुरु झाली.