जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज मंत्री शंभुराज देसाई यांचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे. जरांगेंनी उपोषण सोडावे, याबाबतची चर्चा आजच्या भेटीत होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच या भेटीआधीच जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
"राज्य सरकारकडून भेटीसाठी कोण येणार आहे, मला माहित नाही. काल येणार होते पण आले नाहीत. ते आल्यानंतरच चर्चा होईल. सरकारला मी वारंवार सांगितलं आहे. भेटायला येणार की चर्चेसाठी येणार ही किचकट गोष्ट आहे. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे. पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा आहे," असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच "मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत. मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी, असे म्हणत 12-12 महिने अंमलबजावणीला लागतात का?" असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.
"मी सकारात्मक आहे. जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल. सरकारकडून अशीच टोलवा- टोलवी झाली तर उद्या पाच वाजता मी माझी दिशा ठरवणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. दरम्यान, आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.