मनमाड (प्रतिनिधी) :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय मढे यांनी चांदवड रोड ते एकात्मता चौकापर्यंत अनोखे लोटांगण घालत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. येथे साखळी उपोषणाचा आज सहावा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (दि. 3) मनमाड बंदची हाक देण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनमाड सकल मराठा समाज एकवटून रस्त्यावर उतरत आहे. आज मराठा समाजाचे कार्यकर्ते विजय मढे यांनी चांदवड रोडवर असलेल्या मढे वस्ती येथील आपल्या घरापासून लोटांगण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सुमारे तीन ते चार किलोमीटरचे अंतर त्यांनी लोटांगण घातले. दुपारी भर तापत्या उन्हात हे आंदोलन केले. सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणस्थळ असलेल्या एकात्मता चौक येथे लोटांगण सांगता करण्यात आली.
यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची पत्नी, मुलगा व मोठ्या संख्येने मराठा समाज महिला पुरुष तरुण तरुणी भगवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे आदी जोरदार घोषणाबाजी करत ढोल ताशे वाजवत शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी लोटांगण आंदोलनकर्ते विजय मढे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवेली सराटी येथे आंदोलन करत आहे आज सर्व मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी आणि मराठा समाज आरक्षणाची दाहकता प्रशासनाला कळण्यासाठी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी हे लोटांगण आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. मनमाड शहर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू आहे. आज साखळी उपोषणाचा सहावा दिवस असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचे मराठा कार्यकर्त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी सरकारच्या नावाने तिरडी काढून आंदोलन करण्यात आले. आज लोटांगण आंदोलन करण्यात आले असून आंदोलनाची धार अजून तीव्र करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (दि. 3) मनमाड बंदची हाक देणयात आली आहे. त्यामुळे उद्या मनमाड बंद असणार असून, जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा मानस मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.