महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस हे आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सत्कार केला.
आजपासून पुढील दोन दिवस एकनाथ शिंदे तिरुपती जिल्ह्यातच राहणार आहेत. त्यांनी गुरुवारी पहाटे श्री पद्मावती अम्मावारी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर सकाळी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
महाराष्ट्रातील ज्या भक्तांना आंध्र प्रदेशमध्ये जाऊन तिरुमला तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असं तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येत आहे. तिरुपती देवस्थानकडून महाराष्ट्र सरकारकडे मंदिर बांधण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर उलवे इथे दहा एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येत असून देवस्थान ट्रस्टला 10 एकर जागा महाराष्ट्र सरकारने दिली आहे. मे २०२२ मध्ये तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिरुपतीला जाऊन या संदर्भातील दस्तऐवज मंदिर ट्रस्टकडे सोपविले होते. यानंतर जून २०२३ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते.