राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
पुण्यात शरद पवार गटाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी पवारांनी प्रफुल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याच्या इशाऱ्याचाही चांगलाच समाचार घेतला.
'माझ्याकडं बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत, मी भविष्यात पुस्तक लिहिणार आहे, असं खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले होते. 'प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावं. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.”
“मुंबईत प्रफुल पटेल यांचं घर आहे. त्या घराचे किती मजले ईडीने ताबे घेतले आणि का ताब्यात घेतले यावरही एक प्रकरण पुस्तकात यावं. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल,” असं म्हणत शरद पवारांनी प्रफुल पटेलांना टोला लगावला.