नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने धडक कारवाई करत नाशिकरोड व पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ३५ लाख रुपये किमतीचे २३ तोळे सोन्याचे दागिने व १ तोळा सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे. सचिन भगवान सहजराव (वय २५, रा. ताथवाडे, नवले वस्ती, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यास भेट देत सराफ बाजार व संवेदनशील भागात विशेष गस्त वाढवून व्यापारी आणि नागरिकांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे व अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हेशोध पथकाचे अंमलदार देवी चौक सराफ बाजार परिसरात गस्त घालत होते.
याच दरम्यान चोरीचे सोने विक्रीसाठी एक संशयित इसम देवी चौक परिसरात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित सचिन भगवान सहजराव याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २३ तोळे सोन्याचे दागिने आणि १ तोळ्याची सोन्याची लगड आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे ३५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत हा मुद्देमाल नाशिकरोड पोलीस ठाणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांमधील असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर आडणे करत आहेत.