नवी दिल्ली : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याचे पुरावे नसल्यानं आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.
पुण्यातील एल्गार परिषदेनंतर कोरोगाव भीमा येथे भडकलेल्या हिंसाचार प्रकरणात शोमा सेन यांना अटक झाली होती. मात्र आता शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय. पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या ६ मानवी हक्क कार्यकर्त्यांमध्ये सेन यांचा समावेश होता. त्या ६ जून २०१८ पासून सेन या अटकेत होत्या. NIA ने यापूर्वी त्यांच्या जामिनाला विरोध केला होता, मात्र आता त्यांना न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं NIA कडून सांगण्यात आले.
या प्रकरणातील इतर आरोपींपैकी वकील सुधा भारद्वाज, कवी-लेखक पी. वरावरा राव, नागरी हक्क कार्यकर्ते डॉ आनंद तेलतुंबडे, कामगार कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस, वकील अरुण फरेरा यांचा समावेश आहे. फरेरा यांना आतापर्यंत जामीन मिळाल होता. आणखी एक सहआरोपी, आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि फादर स्टॅन स्वामी यांचाही समावेश होता. सात महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर तिथेच जून 2021 मध्ये कोविडमुळं त्यांचं निधन झालं.