ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यात चर्चांना उधाण
ससून'च्या चौकशी समितीला बिर्याणीची मेजवाणी; पुण्यात चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणात पुन्हा एकदा आता बिर्याणीची एन्ट्री झाली आहे. पुण्यात एका श्रीमंत बापाच्या मुलाने त्याच्या पौर्शे कारने दोन जीवांना धडक दिली. या अपघातात दोन जीवांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पैशांच्या जोरावर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला भ्रष्ट करण्यात आलं. ससून रुग्णालयात आरोपीला मेडिकलला नेलं असता त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आली. अल्पवयीन आरोपी हा दारु प्यायलेला असताना त्याच्या रक्तात दारु आढळली नाही, असा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला. 

याप्रकणी पुणे पोलिसांनी तपास केला असता आरोपीच्या वडिलांनी 3 लाखांची लाच देवून तिथल्या डॉक्टरांना ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यास सांगितल्याचं समोर आलं. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे.

 ससून रुग्णालयात झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत सरकारने तीन सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली. जे. जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. या समितीने आज मेजवानीचा आस्वाद घेत चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. 

ससून रुग्णालय प्रशासनाने चौकशीसाठी आलेल्या समितीची मंगळवारी चांगली बडदास्त ठेवली. समितीतील सदस्यांसाठी पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधून बिर्याणी मागविण्यात आली. अधिष्ठात्यांच्या दालनात मेजवानी सुरू असताना चौकशीसाठी बोलाविलेल्या कर्मचाऱ्यांना जेवायला जाण्यास मनाई करण्यात आली. आणि चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी केली.समितीचे सदस्य बिर्याणीवर ताव मारत असताना बाहेर परिचारिका आणि कर्मचारी उपाशीपोटी ताटकळत थांबले होते, अशी माहिती समोर आली आहे. बिर्याणीच्या बॅगा ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये घेऊन जातानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

चौकशी समितीकडून सकाळी अकरा वाजता चौकशीला सुरुवात झाली. राज्य सरकारने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या ब्लँड सॅम्पलमध्ये फेरफार कशी झाली? याची चौकशी करत आहे. ही समिती ससून रुग्णालयाच्या प्रशासनाची चौकशी करत आहे. गेल्या सात तासांपासून चौकशी समितीचं काम करत आहे. या दरम्यान या चौकशी समितीला ससून रुग्णालयाच्या डीनकडून पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीचा पाहुणचार करण्यात आला. त्यामुळे पुण्यात याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

ही समिती आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. कारण या समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर विरोधकांकडून आक्षेप नोंदवण्यात आले होते. कारण पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. तरीसुद्धा सरकारने पल्लवी सापळे यांची चौकशी समितीच्या प्रमुखपदी नेमणूक केली. त्यानंतर ज्याप्रकारे या चौकशी समितीने ससून रुग्णालयात मेजवानी घेतली याबद्दल पुण्यात जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे एवढी मोठी दुखद घटना घडलेली असताना चौकशी समितीकडून अशाप्रकारे प्रसिद्ध बिर्याणीवर ताव मानला जात असल्याची चर्चा आता पुण्यात होत आहे. याआधी पुणे पोलिसांमधील बिर्याणीची चर्चा ऐकायला मिळाली होती. त्यानंतर या अपघात प्रकरणात पुन्हा बिर्याणीची एन्ट्री झालीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group