पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तिच्या 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्याची तक्रार मनपाकडे केली आहे.
या सोसायटीमधील काही रहिवाशींनी सन 2020 मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी या महिलेकडे 50 मांजरी होत्या. गेल्या पाच वर्षात हा आकडा 350 वर पोहोचला आहे. सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या मांजरांचा सतत उग्र वास येत असतो. तसेच ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा प्रचंड आवाज यामुळे आमचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
सकाळ, दुपार आणि संध्याकाळी या मांजरी मोठ्या आवाजात ओरडत असतात. त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो. दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवाशी हैराण झाले आहेत. यामुळे रहिवाशांचा मनस्ताप वाढला आहे.