पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या ( सिनियर इन्व्हिटेशन लीग ) टी-ट्वेंटी क्रिकेट साखळी स्पर्धेत, नाशिकने परभणीवर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. केवळ ३८ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ९१ धावा फटकवणारा नाशिकचा युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साहिल पारख हा या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला.
प्रथम फलंदाजी करताना परभणीने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. त्यात नाशिकच्या आकाश बोरसेने २ तर यासर शेख व रोहन शेडगेने प्रत्येकी १ बळी घेतला. विजयासाठीच्या १६५ धावा साहिल पारखच्या घणाघाती ९१ धावांच्या जोरावर नाशिकने १४ व्या षटकातच ७ गडी राखून पार केल्या. साहिल पारखला आर्यन पालकरने ३९ धावांची फटकेबाज साथ दिल्यामुळे दोघांनी ८.३ षटकातच ९८ धावांची जोरदार सलामी दिली. पाच साखळी सामन्यातील या चौथ्या विजयाने नाशिक जिल्हा संघाने जी गटात क्लब ऑफ महाराष्ट्रच्या पाठोपाठ दुसरे स्थान मिळवले.
क्लब ऑफ महाराष्ट्रने नाशिकला ३९ धावांनी पराभूत केले होते. त्या सामन्यात गोलंदाजीत नाशिकच्या तन्मय शिरोडेने ३ , समाधान पांगारे व यासर शेख प्रत्येकी २ तर प्रतीक तिवारी व रोहन शेडगेने प्रत्येकी १ बळी घेतला. फलंदाजीत यासर शेखने ४५ व मुर्तुझा ट्रंकवालाने ३६ धावा करत चमक दाखवली , पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.