भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
img
Dipali Ghadwaje
राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत  आहे. भररस्त्यावर गोळीबाराच्या घटना घडत आहेत. एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे पुण्यात मंगळवारी (ता.१६) सायंकाळच्या सुमारास एक थरारक घटना घडली आहे.  

पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकावर अज्ञात आरोपींनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, बंदुकीतून गोळी फायर न झाल्याने आरोपींचा हा प्रयत्न फसलाय. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, धीरज दिनेशचंद्र आरगडे असं गोळीबारातून बचावलेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धीरज हे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरूमजवळ उभे होते.  

त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरुन तिथे आले. हल्लेखोरांनी फूड डिलिव्हरी बॉयसारखे कपडे घातले होते. याशिवाय त्यांनी हेल्मेट देखील घातलं होतं. शोरुमजवळ उभ्या असलेल्या धीरज यांच्यावर हल्लेखोरांनी दोन वेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंदुकीतून गोळी न सुटल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

त्यामुळे धीरज हे जीवघेण्या हल्ल्यातून बचावले. आरडाओरड झाल्याने आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. या घटनेनंतर धीरज आरगडे यांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घेतला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group