मणिपूरमध्ये मतदानाला गालबोट; गोळीबारात 3 जखमी , EVM मशिनही तोडले
मणिपूरमध्ये मतदानाला गालबोट; गोळीबारात 3 जखमी , EVM मशिनही तोडले
img
Dipali Ghadwaje
18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जागांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा टप्पा आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाराने धुमसत असलेल्या मणिपूरमध्ये आज लोकसभेचे मतदान होत आहे. मणिपूरमधील लोकसभेच्या दोन जागांवर आज मतदान सुरू आहे. अशातच मतदानावेळी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच ईव्हीएमचीही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मणिपूरमधील मोइरांग भागातील थामनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ समाजकंटकांच्या एका गटाने अनेक राऊंड गोळीबार केला. गोळीबारामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये एकच खळबळ उडाली. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराच्या आवाजात लोक मतदान केंद्राबाहेर पळताना दिसत आहेत. या गोळीबारात ३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतआहे.

त्याचबरोबर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, इतर काही ठिकाणीही अशा प्रकारे हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. इनर मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत थोंगजू विधानसभा मतदारसंघात स्थानिक लोक आणि अज्ञात हल्लेखोर यांच्यात मारामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मणिपूरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 15.44 लाखांहून अधिक मतदारांपैकी सुमारे 28.19 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत, अंतर्गत मणिपूर मतदारसंघात 29.40 टक्के मतदान झाले, तर बाह्य मणिपूरमध्ये 26.02 टक्के मतदान झाले. बाह्य मणिपूर आणि अंतर्गत मणिपूरच्या काही भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group