नाशिक (चंद्रशेखर गोसावी):- उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख आणि नाशिक मधील ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना आज सकाळी तडपारीची नोटीस पोलीस विभागाने बजावली आहे. ऐन लोकसभेची धामधूम सुरु असताना ही नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे आणि आता लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील होऊ लागले आहे. पण याच दरम्यान मोठी घडामोड झाली असून त्यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सकाळी तडपारीची नोटीस बजाविण्यात साठी अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी हे त्यांच्या निवासस्थानी गेले असता, त्यांनी ही नोटीस स्विकारली नाही. त्यांना याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर नोटीस स्वीकारेल असे बडगुजर यांनी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही नोटीस परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे.
उबाठा शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामधील काही महत्त्वाचे गुन्हे म्हणजे अलीकडेच उघडकीस आलेला मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी असलेले संबंध. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अलीकडच्या काळामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांनी दिलेल्या पत्राबाबत त्यांची खुली चौकशी करून गुन्हा देखील सरकार वाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात अजूनही काही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांची यापूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त पाटील यांनी चौकशी देखील केली होती. त्यावेळी बडगुजर यांनी या सर्व प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा करत खोटी कारवाई असल्याचे सांगितले होते. आज पोलिस विभागाने केलेल्या या कारवाईनंतर नाशिकच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली असून आता बडगुजर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी जी नोटीस बजावली आहे ती त्यांच्यावर असलेल्या निवडणुकी संदर्भातील गुन्ह्यांच्या संदर्भात आहे. सन 2014 मधील निवडणुकीत त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना शिक्षा झाली होती.
याशिवाय महानगरपालिका आणि इतर निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी केलेल्या कृत्या बाबत गुन्हे दाखल आहेत. मागील बारा वर्षापासून सुधाकर बडगुजर हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला आहे. तर त्यांनी शिवसेना महानगरप्रमुख याचबरोबर महानगरपालिकेचे सभागृह नेते शिवसेना गटनेते या स्वरूपाची पदे देखील त्यांनी भूषविली आहेत.