लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलाची कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस दलाची कारवाई
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, तसेच अवैध धंद्याचे उच्चाटन व्हावे, यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या सराईत गुन्हेगार, समाजकंटक तसेच संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात अवैधरित्या दारू व्यवसाय करून समाजात अशांतता पसरविणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येत असून छापेमारी सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून अवैधरित्या होणाऱ्या मद्यवाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून, चेकपोस्टवर फिक्स पॉईंट नेमण्यात आले आहे. तसेच आंतरराज्य व आंतरजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या हालचालिंवर लक्ष ठेवण्यासाठी सरहद्दीवर नाकाबंदी लावण्यात येवून तपासणी सुरू आहे. तसेच शस्त्र परवानाधारकांकडे असलेले शस्त्रे जमा करण्यात आली असून अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांची गोपनीय माहिती घेवून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुवव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांसह, समाजविघातक कृत्य करणाऱ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून या गुन्हेगारांना विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले जाणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात येत असून सर्व मतदान केंद्र व संवेदनशील मदतान केंद्रांची माहिती घेण्यात येत आहे. तसेच पोलीस ठाणेनिहाय व मुख्यालय स्तरावर पथसंचलन, मॉकड्रिलची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट स्किम राबविण्यात येत असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रीशीटर, अवैध धंदे करणाऱ्या संशयितांची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे.

तसेच जिल्हा अभिलेखावरील गुन्ह्यांमध्ये फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याची कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 16 मार्चपासून सद्यस्थितीत 32 सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. आणखी 50 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित आहे. एम.पी.डी.ए. कायद्यान्वये 4 प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करून 21 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 5 देशी बनावटीचे पिस्टल, 15 धारदार तलवारी, 8 कोयते, चॉपर, फायटर अशी अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र परवाना असलेले एकुण 751 अग्निशस्त्रे जमा करण्यात आली आहे.

सीआरपीसी 107 अन्वये 973 सदस्य, प्रतिबंधात्मक कारवाई सीआरपीसी 108 अन्वये 10 उमेदवार, सीआरपीसी 109 अन्वये 73 सदस्य, सीआरपीसी 110 अन्वये 29 सदस्य, सीआरपीसी 151 अन्वये 25, दि.16 मार्च ते आजपर्यंत दारूबंदी कायद्यान्वये एकूण 1126 केसेस करण्यात आलेल्या असून 87,440 लिटर देशी-विदेशी, गावठी दारू साठा जप्त, तसेच अवैध गुटख्याच्या 78 केसेस अशा दोन्ही मिळून 1272 केसेस दाखल करण्यात आल्या असून एकुण किं. रू. 3,53,52,262 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत, अवैध वाहतुकीच्या एकुण 121 केसेस दाखल, विनाहेल्मेट, नोपार्किंग, बेदरकार पणे वाहन चालविणे, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह इत्यादी हेडखाली एकूण 8548 इसमांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई, 75,74,050 रुपयांचा दंड जिल्ह्यातील 40 पोलीस ठाणे निहाय 1665 वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.

जिल्हा अभिलेखावरील गुन्ह्यात पाहिजे असलेल्या 57 आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील 40 पोलीस ठाणे, 8 उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे दररोज कारवाई करीत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group