१९ मे २०२४
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भक्त परिवारातील हजारो भाविकांच्या सहभागातून विराट शक्तीप्रदर्शनाने शांतीगिरी महाराजांच्या प्रचाराची सांगता झाली.
महाराजांच्या विजयाची गुढी उभारण्याचा निर्धार जय बाबाजी भक्त परिवाराने केला. भक्त परीवारातील ‘शांतीदूत‘ यांनी घराघरात जाऊन प्रचार केला. मतदारांना कुठलेही प्रलोभन द्यायचे नाही, कोणालाही विरोध नाही, कोणावर आरोप नाही. सत्य मार्गाने विनम्रपणे निवडणूक लढायची आणि जिंकायची. तसेच ’अब की बार दस लाख पार’ असा नारा देत कुठल्याही परिस्थितीत दहा लाख मताधिक्य मिळवणारच असा निर्धार भक्त परिवाराने केला.
शहरातील विविध भागात अती विराट रॅली काढण्यात आली. आम्ही लढणार आणि जिंकणार, आता नको आदला-बदली आम्हाला पाहिजे बादली आणि बादली या महाराजांच्या निशाणीचा जोरदार प्रचार करण्यात आला. रॅली दरम्यान बहुसंख्य नागरिकांनी स्वामी शांतीगिरी महाराजांचे पुष्पहार, शाल व श्रीफळ व पेढे देऊन विजयाची खात्री दिली. लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा.. असा देश सेवेचा विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवार आणि देशप्रेमी नागरिक विजयासाठी प्रयत्नशील आहे.
शांतीगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी भक्त परिवार सरसावला आहे. विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या अफवा पसरवत आहे. येत्या दोन दिवसात अफवांचे प्रमाण वाढणार आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही यावेळी भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले.
शांतीगिरी महाराजांनाच मतदान का? भक्त परिवाराने दिली माहिती
शांतीगिरी महाराज हे देशभक्त व नि:स्वार्थी व्यक्तिमत्व असून देश सेवा करण्यासाठी ते निवडणुकीत उभे आहेत. पुढे येणार्या कुंभमेळ्यात ते योग्य नियोजन व विकास करण्यास सक्षम आहेत. राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ते राजकारणात आले आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून ते शेतकरी,कष्टकरी,मजूर,विद्यार्थी व नाशिकचा सर्वांगीण विकास करतील, असे भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले.
Copyright ©2024 Bhramar