मालेगाव : चणकापूर धरणातील पाणीपुरवठा योजना सुरू होत नसल्याच्या कारणामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावातील सर्व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावात पाणी प्रश्नावरून संपूर्ण गावानेच मतदानावर बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. मौजे मेहुणे येथे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नितीन देवरे व अन्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले.
परंतु, जोपर्यंत झाडी चणकापूर धरणातून पाणीपुरवठ्याची योजना सुरू होत नाही, तोपर्यंत आमचा मतदानावरील बहिष्कार कायम राहील, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेऊन या अधिकाऱ्यांना आल्यापावली परत पाठवले. त्यामुळे या गावकऱ्यांच्या बहिष्कार मतदानावर कायम राहिला आहे. बहिष्कार मागे घेण्याचा प्रशासनाने केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.