इगतपुरीत मतदान सुरळीत
इगतपुरीत मतदान सुरळीत
img
चंद्रशेखर गोसावी
इगतपुरी (भ्रमर वार्ताहर) :- इगतपुरी विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी उत्साहात आणि शांततेत मतदान सुरू झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, अपक्ष शांतीगिरी महाराज, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे.

प्रत्येक पक्षाच्या समर्थकाने अधिकाधिक मतदान पारड्यात मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आज सायंकाळी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

पोलीस यंत्रणेकडून सूक्ष्म नियोजन य बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सक्रियतेने काम करीत आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी कसून प्रयत्न सुरू केले आहेत. इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, हरसूल, त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पडत असताना प्रशासनही सूक्ष्म लक्ष ठेवून आहे, अशी माहिती इगतपुरीच्या निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी दिली.

मतदारांनी मतदान करावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मोडाळे यांच्याकडून माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत जनजागृती करण्यात आली. मतदान करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक फळझाड देऊन ते जोपासण्याचा संदेश दिला जात आहे. मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याची आठवण म्हणून हे फळझाड गावाला फायदेशीर ठरेल, असे मतदारांनी सांगितले.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group