नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी निलंबित केले आहे. राज्यामध्ये प्रथमच लोकसभा निवडणुकीत निलंबनाची कारवाई झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. तसेच या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने वरिष्ठ अधिकारी देखील रस्त्यावर उतरून काम करीत आहेत. हे सर्व घडत असताना मात्र काही ठिकाणी कामामध्ये दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे निवडणुकीच्या निमित्याने रस्त्यावर उतरून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी करीत आहेत. निवडणुकी प्रचार शुक्रवारी संपल्यानंतर संपूर्ण शहरासह जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. असे असताना शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. असाच तपासणी नाका वडनेर दुमाला या ठिकाणी करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी भद्रकाली पोलीस ठाण्याचे सागर अशोक पाटील आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे फिरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या ठिकाणी तपासणी नाका होता पण ज्यावेळी आचारसंहिता संपून प्रशासन तपासून काम करत असताना शनिवारी रात्रीच्या वेळी ज्यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा सह पथक या ठिकाणी पोहोचले त्यावेळी या चेक नाक्यावर नियुक्त करण्यात आलेले सागर पाटील आणि फिरोज खान हे दोन्हीही कर्मचारी या ठिकाणी हजर नव्हते. काही काळ वाट बघितल्यानंतरही हे कर्मचारी न आल्यामुळे निवडणूक कामात हलगर्जी केल्याने या दोन्हीही कर्मचाऱ्यांना आज सायंकाळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी निलंबित केले आहे.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यामुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून या लोकसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये कर्मचारी निलंबित होण्याची पहिलीच घटना नाशिक मध्ये झाली आहे.