नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) – लग्नाच्या नव्या संसाराच्या स्वप्नांसह पतीसोबत आनंदी जीवन जगण्याची आशा असलेल्या एका नववधूच्या अचानक बेपत्ता होण्याने तिच्या कुटुंबीयांवर संकट ओढावले होते. मात्र, नाशिक रोड रेल्वे पोलिसांनी १४ दिवसांत तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे तिला शोधून पतीच्या ताब्यात सुखरूप सोपवले.
मूळची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असलेली ही २२ वर्षीय नववधू मुंबईत राहणाऱ्या सचिन इंगळे यांच्याबरोबर विवाह बंधनात अडकली. लग्नविधीचा सोपस्कार झाल्यानंतर नवरा,सासू व इतर नातेवाईकांसोबत ही नववधू नाशिक येथे देवदर्शनासाठी आली होती.
देवदर्शन आटपून मुंबईला जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे २० फेब्रुवारी २०२५ रोजी ते आले आणि नववधू रेल्वे स्टेशनवरून बेपत्ता झाली. यानंतर तिच्या पतीने, सचिन बळीराम इंगळे (वय २६, व्यवसाय – रिक्षाचालक, मुंबई) यांनी नाशिक रोड रेल्वे पोलिसांकडे हरवल्याबाबतची तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार आशा मोरे व गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील संयुक्तिक तपास सुरू असताना उफाडे पाटील यांनी अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करत नववधूचा इंस्टाग्राम आयडी आणि व्हॉट्सअॅपद्वारे ठावठिकाणा शोधला. मोठ्या संयमाने तिच्याशी संवाद साधत, विश्वास संपादन करत, तिला पोलिस स्टेशनमध्ये येण्यास प्रवृत्त केले.
दि. ५ मार्च २०२५ रोजी नववधू आणि तिचा नवरा पोलिस ठाण्यात हजर झाल्यावर तिच्या पतीला बोलावून तिला त्याच्या ताब्यात देण्यात आले. या क्षणी पोलिस अधिकाऱ्यांनी समुपदेशन करत संसारातील लहानसहान अडचणींना तोंड देण्याचा सल्ला दिला.
अलीकडे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत, जिथे तरुण मुली मानसिक गोंधळात किंवा काही चुकीच्या प्रभावाखाली घराबाहेर पडतात. मात्र, पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि आधुनिक तपास पद्धतींच्या आधारे अशा हरवलेल्या मुलींना शोधण्याचे कौशल्य दाखवले आहे. समाजानेही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून मुलींमध्ये संकटांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन देण्यावर भर द्यावा.
ही कारवाई पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय अधिकारी सूर्यकांत बागल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सचिन बनकर, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष उफाडे पाटील, नाईक आणि महिला पोलीस हवालदार आशा मोरे यांच्या पथकाने केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.