नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : एके काळी नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ अशी ओळख असलेल्यां यशवंत मंडईचे गेल्या काही दिवसांपासून पाडकाम सुरू आहे. नाशिकचे एक भूषण असलेली इमारत पाडकामामुळे नामशेष होत असल्याचे पाहून असंख्य अस्सल नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
या संस्मरणीय वास्तूच्या पाडकामाचे फोटो काढून ते आपल्या मोबाईलमध्ये संग्रहित करीत असल्याचे चित्र सध्या मंडईच्या परिसरात फिरताना दिसून येत आहे. सध्या मंडईचे पाडकाम प्रगतिपथावर आहे. सर्व बाजूंनी पत्रे उभे करून हा परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. ठेकेदाराचे कर्मचारी सकाळपासूनच कामास सुरुवात करीत असल्याने सकाळी कामानिमित्त येणारे अनेक नाशिककर या इमारतीकडे पाहून जुन्या आठवणींना उजाळा देताय.
57 वर्षांपूर्वीची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी बाजारपेठ म्हणजे यशवंत मंडई जीर्णावस्थेत धोकादायक स्थितीत आल्याने मंडईची इमारत तोडण्याचे काम नाशिक महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. सन 1968 मध्ये तयार झालेल्या रविवार कारंजावरील यशवंत मंडईने शहरातील अत्याधुनिक व आकर्षक वास्तू म्हणून महत्त्व वाढवले होते. या ठिकाणी भव्य इमारत व पार्किंगची सुविधा करण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे.