भ्रमर प्रतिनिधी : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने "स्वच्छ देवळाली, सुंदर देवळाली, हरित देवळाली' या घोषणेनुसार साजेसे काम केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळालीने देशात दुसरा तर राज्यातील कॅन्टोन्मेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकावला. मागील वर्षीही देवळालीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. स्वच्छ सर्वेक्षणामधे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला १२,५०० गुणांमधून १०,२५५ गुण मिळाल्याने देशात दुसरा क्रमांक मिळाला. राज्यात मात्र गेल्या वर्षीप्रमाणे पहिला येण्याचा बहुमान मिळाल्याचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले.
दर वर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येते. देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आहे. २०२० मध्ये स्वच्छ भारत अभियानात घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने स्वच्छतेबाबत विशेष मोहीम राबविण्यासाठी नियोजन करून कामकाजात सुधारणा केली. त्यामुळे सर्वेक्षणात वरचे स्थान मिळाले. संपूर्ण प्रशासनाने संयुक्तिक काम केले.
सफाई कर्मचा-यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाचा आलेख उंचावला. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता व स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे यासारख्या विविध पद्धती राबविताना नागरिकांनाही अभियानात सामावून घेतले.
देशात तेलंगणामधील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक मयूर सोदे, शुभम शेंडगे, तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद, आरोग्य पर्यवेक्षक शिवाजी सपकाळे, सुरेश थामेत यांनी कर्मचा-यांच्या मदतीने अस्वच्छता असलेल्या ठिकाणी जाऊन कचरा गोळा करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे या कामी शर्थीचे प्रयत्न केले.
शहरातील नागरिकांचे सहकार्य
शहरासाठी समर्पितपणे काम करणा-या सर्व स्वच्छता कामगारांना याचे श्रेय जाते. यापुढेही ही स्थिती अजून सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करीत देशात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मानस आहे.
-अभिषेक मणी त्रिपाठी, मुख्य कार्यकारी अधिकारी
मेहनत व मार्गदर्शन मोलाचे
कामगारांची मेहनत आणि अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभल्याने देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड सर्वेक्षणात सलग दुस-या वर्षी केंद्रात दुसरा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
-एन. एच.पटेल. गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर
स्वच्छतेसाठी देवळाली प्रसिद्ध
२०२१ पासुन स्वच्छता सर्वेक्षणात देवळाली राज्यात प्रथम स्थानी आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात दुस-या क्रमांकावर आहे. ब्रिटिश काळापासून देवळाली हे आरोग्यदायी हवामान व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असून अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे यश मिळाले आहे
सचिन ठाकरे, सदस्य देवळाली कॅन्टोन्मेंट.
देवळालीचे देशपातळीवर यश
२०२१ मध्ये देशात चौथा क्रमांक
२०२२ मध्ये देशात प्रथम क्रमांक
२०२३ मध्ये देशात दुसरा क्रमांक
२०२४ मध्ये देशात दुसरा क्रमांक
अशा प्रकारे सलग चार वर्षे देशातील अव्वल कॅन्टोन्मेंट म्हणून आपली ओळख सिद्ध केली आहे.या यशस्वी वाटचालीसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने कचरा मुक्त शहर जीएफसी ३ स्टार, तसेच वॉटर प्लस हे अत्यंत प्रतिष्ठित नामांकनही मिळवले आहे. हे दोन्ही प्रमाणपत्र शाश्वत आणि समग्र स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वाचे मानले जातात.