नाशिक (भ्रमर प्रतिनिधी): शिवसेनेत माजी खासदार हेमंत गोडसे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता ज्येष्ठ शिवसैनिक मामा ठाकरे हे देखील पक्षात विचारणा होत नसल्याने नाराज आहेत. ते नाराजीमुळे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मामा ठाकरे यांनी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणत्याही अटी-शर्तीविना प्रवेश केल्याचे ते सांगतात. आपल्याला बाळासाहेबांची व दिघे साहेबांची शिकवण असल्याने निस्वार्थीपणे पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या ज्यांचे शिवसेनेत प्रवेश होत आहेत ते अटी शर्तींवर होत आहेत. नाशिकमध्ये १९७७ साली सिडकोमध्ये दोन वॉर्ड असताना शिवसेनेची पहिली शाखा आपण उघडली असून, पक्षात असलेले काम एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. पक्ष संघटना वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नसून, आपल्याला पक्ष प्रवेश झाल्यापासून पक्षात कोणीही विश्वासात घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांना पूर्वी भेटणे सोपे होते,मात्र त्यांच्या आसपासच्या काही लोकांमुळे आता त्यांना भेटणेही अवघड झाले आहे. आपण एक स्वाभिमानी शिवसैनिक असून, कोणाचीही चमचेगिरी करणे जमत नाही, असे ते म्हणाले. सिडकोमध्ये अनेक कामे होत नाहीत. सिडको फ्रि होल्ड करण्यासाठी आपण दादा भुसेंसह इतरांना आजपर्यंत तीन-चार वेळा पत्र दिले. मात्र,कुठलीच हालचाल होत नाही. आपल्याला पक्षात विचारणा होत नसेल तर दुसरा विचार करावा लागेल,असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.