चंदू चव्हाण या जवानाचं नाव सर्वांनाच माहित असेल. याच बडतर्फ चंदू चव्हाणला देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथील चंदू बाबुलाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. भारत- पाकिस्तान सीमेवर तैनात असताना भारताची सीमा क्रॉस करत पाकिस्तानात प्रवेश केला होता. त्यानंतर चंदू चव्हाण याना पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. तीन महिने २१ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर पुन्हा मायदेशी परतले होते. यानंतर मात्र चंदू चव्हाण यांना सैन्य दलातून बडतर्फ करण्यात आले होते.
पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण
मागील काही दिवसांपासून चंदू चव्हाण यांनी पालिका कर्मचाऱ्यांकडे गटार साफ करण्याची मागणी केली आहे. अशात काल ते पुन्हा पालिकेत आपली कैफियत मांडण्यासाठी गेले असता महापालिका येथे आंदोलना दरम्यान चंदू चव्हाण यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप चंदू चव्हाण यांनी केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.
पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान चंदू चव्हाण यांनी भारतीय सैन्याबाबत खोटी व बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट केल्या आहेत. तसेच बडतर्फ सैनिकांना सैन्याचा गणवेश बंदी असतांना देखील सैन्याचा गणवेश घालून फिरणे यासह इतर बाबींमुळे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनात येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर धुळे येथून आज चंदू चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.