नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी उपनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अंधारात धाव घेतली. पोलिसांना पाहून गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली.
या धावपळीत एका गुन्हेगाराच्या खिशातील गावठी पिस्तुलातून फायर झाल्याने तो जखमी झाला. हा जखमी गुन्हेगार औषधोपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल झाल्याने तो व टोळीतील इतर साथीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. या दरोडेखोरांकडून पिस्तुल, दुचाकीसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ एप्रिलला रात्री सहाय्यक पोलिस निरीक्षक शांताराम महाजन, हवालदार विनोद लखन, पंकज कर्पे, सौरभ लोंढे, संदेश रगतवान हे गस्त घालत होते. देवळाली गावातील कुस्तीच्या मैदानाच्या भिंतीशेजारी अंधारात सराईत गुन्हेगार सार्थक आहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे व त्यांचे तीन साथीदार दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेले दिसले.
पोलिसांची चाहूल लागताच ते दुचाकीवरून पळू लागले. हार्दिक बेलदारकडे धारधार कोयता, सार्थक आहिरेकडे गावठी पिस्तुल, पवन घोलपकडे दोरी असल्याचे पोलिसांना बॅटरीच्या प्रकाशात दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता देवळालीगाव, आण्णा भाऊ साठेनगरच्या गल्लीबोळातून हे दरोडेखोर फरार झाले.
पोलिस या टोळीचा शोध घेत असताना पहाटे चारच्या सुमारास एक जखमी व्यक्ती बिटको रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालयाकडून समजले. सार्थक आहिरे नावाच्या या व्यक्तीच्या मांडीला गोळी लागली असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रवाना केले. त्याच्या सोबत आलेले पवन घोलप व समीर सोनवणे यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असताना त्यांनी सांगितले की, पोलिसांना पाहून देवळाली गावातून विहितगावला मोटरसायकलवर पळून जाताना सार्थक गावठी पिस्तुल पॅन्टच्या खिशातून बाहेर काढत होता. त्यावेळी गोळी उडून त्याच्या मांडीत घुसून तो जखमी झाला. या संशयितांकडून हार्दिक बेलदार व आबा पवार या साथीदारांची नावे समजली. पोलिसांनी त्यांच्यासह पाच जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी दिली आहे.
हवालदार पकंज कर्पे यांच्या तक्रारीवरून सार्थक आहिरे, ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकात पवार (२३, देवळालीगाव), हार्दिक हिरालाल बेलदार (२६,देवळालीगाव), पवन सुनिल घोलप (१९, देवळालीगाव), समीर संजय सोनवणे (२०, विहीतगाव) आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सार्थकने वापरलेली २५ हजाराची गावठी पिस्तुल तसेच कोयता, दोरी, १ लाख १० हजाराची पल्सर मोटरसायकल, ७० हजाराची सुझुकी कंपनीची अॅक्सेस मोपेड असा २ लाख ५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संजीव फुलपगारे, सहाय्यक निरीक्षक शांताराम महाजन, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पंकज कर्पे, बरेलीकर, सूरज गवळी, सदेंश रगतवान, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, नाशिक रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सूर्ववंशी, नाना पानसरे, समाधान वाजे आदींनी ही कामगिरी केली. त्यांना बक्षिस देण्याची शिफारस वरिष्ठांकडे केल्याचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले.