नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीचा टोल कापल्याची अजब घटना नाशिकमध्ये घडली.
याबाबत गाडी मालकाने दै. भ्रमरशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. या व्यक्तीची गाडी घराच्या पार्किंगमध्ये उभी असताना देखील डोंगराळे टोल प्लाझा या ठिकाणी काल (दि.२५) रोजी दुपारी पावणे पाच वाजेच्या सुमारास टोल कापला गेला. गाडी कुठेही गेली नसतानाही टोल कसा कापला गेला, याबाबत गाडी मालकाने आयसीआयसीआय फास्टॅगच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता त्यांनी कंपलेंट दाखल करून पुढील २५ दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
या प्रकरणाचा गाडी मालकाला पश्चाताप होत असून, अशा प्रकारे किती जणांची टोलवसुली विनाकारण होत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टोल प्लाझाच्या या भोंगळ कारभाराविरोधात कारवाई होऊन, अशा प्रकारे टोल कापल्या गेलेल्या वाहनधारकांना कंपनीने खातरजमा करुन त्वरीत न्याय द्यावा, असे या वाहनधारकाने सांगितले.
वाहनधारकांचा वेळ वाचावा म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगची सुविधा सुरू केली. मात्र अशा प्रकारे पैसे कापले गेल्यास इतके दिवस का लागावे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबतही काही तरी तोडगा काढण्यात यावा. अशा कारभारामुळे उगाच वाहनधारकांचे नुकसान होत आहे.
टोल प्लाझाने जितकी तत्परता पैसे कापण्यास दाखवली; तितक्याच तत्परतेने त्यांनी चुकीने कापलेले पैसे परत करायला हवे. यासाठी २५ दिवस का लागतात असा सवाल त्यांनी केला.