नाशिक : शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी म्हणून महानगरपालिका व पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून त्यामध्ये अतिक्रमण काढणे, नवीन सिग्नल यंत्रणा बसविणे व वाहतूक बेटांचा आकार कमी करणे किंवा ती काढून टाकावी यावर चर्चा झाली आहे.
नाशिक शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून यावर विचार विनिमय करण्यासाठी आणि योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज सकाळी पार पडली.
या बैठकीला पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी व वाहतूक शाखेचे चारही विभागाचे अधिकारी यांच्यासह महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील, रवींद्र बागुल, विशाल तांबोळी व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेण्यात आले आहेत.
त्यामध्ये शहरांमध्ये 27 ठिकाणी नवीन सिग्नल लावण्यात येणार असून सहा जुनी बंद पडलेली सिंगल यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे तर तीस ठिकाणी अतिरिक्त पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. 34 गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणारे आणि रस्त्यावरील तसेच दुकानांसमोरील बेकायदा अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सहा ठिकाणच्या वाहतूक बेटांचा आकार कमी करावा किंवा काढून टाकण्यासंदर्भामध्ये देखील निर्णय झाला.
या निर्णयाबरोबरच इंदिरानगरच्या बोगदा संदर्भात देखील चर्चा झाली असून तो वाढविण्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क करण्यात येणार आहे व आठवण हॉटेल समोर असलेला विद्युत पोल देखील तातडीने हटविण्यात येणार आहे.
मुंबई नाका पोलीस ठाण्या शेजारील बस स्टॉप देखील स्थलांतरित करण्यात येणार असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरातील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरात वाहतुकीला अडथळा होणारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
शहरातील सर्विस रोड वर आणि काही भागांमध्ये बंद पडलेली वाहने ही रस्त्यावर आहेत, ती सात दिवसात काढून घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.