धुळ्याकडून मुंबईकडे लोखंडी सळया घेऊन चाललेल्या ट्रकला टेम्पोने (छोटा हत्ती) मागून धडक दिली.
या सळया शरीरात घुसल्याने 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. द्वारका चौकातील उड्डाणपुलावर रविवारी (दि.१२) रात्री आठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, धुळ्याकडून मुंबईच्या दिशेने लोखंडी सळया घेऊन ट्रक चालला होता. मागून आलेला भरधाव टेम्पो ट्रकवर धडकला. आणखी एक भरधाव वाहनही या अपघातग्रस्त वाहनांवर येऊन धडकले.
या भीषण अपघातात चार जणांच्या शरीरात लोखंडी सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. चौघांचाही रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय सहा जण जखमी झाले. अपघातानंतर उड्डाणपूलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ उड्डाणपूलावर धाव घेतली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मदतकार्य सुरू केले.
या अपघातात अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते या चौघांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर राहुल राठोडे (वय २०), लोकेश निकम (१८), अरमान खान (१५) यांच्यासह आणखी तिघेजण जखमी झाल्याचे समजते.
अपघातग्रस्त सिडकोतील रहिवाशी
अपघाआत मृत व जखमी झालेले सर्वजण सिडकोतील सह्याद्रीनगर येथील रहिवासी आहेत. ते टेम्पोने निफाड तालुक्यात देवदर्शनासाठी गेले होते. परतताना हा टेम्पो उड्डाणपुलावरून द्वारका चौकात उतरत असताना ट्रकला धडकला.