नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी किरण सानप या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली असून किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५ मे रोजी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावमध्ये सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला.
कांद्यावरुन बोला, असे म्हणत किरण सानप या युवकाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. तसेच तो गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.